कोरोनाच्या धक्क्यात असतानाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन क्लासेसचा आधार घेण्यात आला. ऑनलाइन अध्यापनाचे प्रयोग पहिले काही महिने झाल्यानंतर त्याचा सराव झाला. त्यात सातत्य राहिल्याने पुढे हे वर्गच शाळेने सुरू ठेवले. ऑनलाइन शिकवणे आणि ऑफलाइन अभ्यास ग्रुपवर पाठवणे सुरू झाल्याने, दिवसभर घरीच असल्याने निवांत लिखाण करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना लिखाणाला भरपूर वेळ मिळाल्याने हस्ताक्षर काढताना त्याला गतीची साथ आवश्यक आहे याचाच विसर पडला. परिणामी अभ्यासाच्या तोंडावर ही समस्या पुढे आली आहे. दहावी, बारावीसह आठवी आणि नववीची वार्षिक परीक्षाही ऑफलाइन असल्याने ऐनपरीक्षेत वेळ न पुरल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम होऊ शकतो, अशी पालकाना भीती आहे.
---
शाळेत आणि घरात अभ्यास करण्याच्या स्थितीमध्ये मोठी ताफावत आढळते. असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते हाताचे काम करताना त्याला आधार मिळण्यासाठी वर्गात जसे बेंच असतात, तसे ते घरात असत नाहीत. दोन्ही पाय जमिनीवर टेकतील या पद्धतीने बसणे आणि दोन्ही हातांना आधार मिळेल, असे टेबल घेऊन लिखाण करायला बसला, तर हातदुखी कमी होऊन अक्षर सुधारायला मदत होऊ शकते, असेही ते मानतात.
--
लिखाणाची वेळ वाढली!
नियमित शाळा सुरू असताना वर्गात शिकविताना शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेले तितक्याच गतीने वहीत टिपून घेण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली होती. गेल्या वर्षभरात ऑनलाइन वर्गात शिक्षक शिकवत होते आणि विद्यार्थी त्यांच्या सोयीने अभ्यास पूर्ण करत होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा वेग अगदीच मंदावला. वर्षभरात याकडे दुर्लक्ष झाल्याने ऐन परीक्षेच्या काळात हाताचे दुखणे वाढू लागले आहे.
--
गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली आहे. त्यामुळे शंभर गुणांचा पेपर कसा सोडवणार, असा प्रश्न मुलांकडून विचारला जात आहे. त्यासाठी मुलांना आतापासूनच प्रश्नपत्रिका वेळेत सोडविण्यासाठी सराव करण्याचा सल्ला दिला आहे.
- सागर पवार, पालक
-
परीक्षा जवळ आल्याने मुलांकडून वाचनासोबतच लिखाणाचाही सराव करून घेत आहे. सध्या क्लास आणि शाळाही बंद आहे. त्यामुळे मुलांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी गद्याचे उतारे लिहून काढण्याचा सराव करून घेत आहोत.
- गणेश कोकणे, पालक
विद्यार्थ्यांना हे करणेही शक्य!
परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून वेळ लावून पेपर सोडवणे
हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करणे
पेपर सोडवताना किंवा लिखाण करताना उंचीनुसार योग्य टेबल-खुर्चीचा वापर करणे
दिवसभरात किमान आठ ते दहा पाने लिखाणाचा सराव करणे
परीक्षा काळात खात्री असलेल्या प्रश्नांची उत्तरे अग्रक्रमाने लिहिणे