नाशिक : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये शनिवारी (दि.२४) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या प्रचार- प्रसारासाठी तब्बल २० लाख हस्तपत्रकांचे वाटप करण्यात येणार असून, सुमारे ८० हजार झेंडे आणि ६० हजार स्टिकर्स वाहनांवर लावण्यात आले आहेत. मोर्चासाठी जिल्हाभरातून सुमारे १५ लाखांहून अधिक समाजबांधव सहभागी होण्याचा अंदाज बांधला जात असून, शहरात दाखल होणाऱ्या समाजाच्या विद्यार्थी, मुली, महिलांसह समाजबांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी कोअर कमिटीकडून मोर्चाचे सूक्ष्म नियोजन सुरू असून, मोर्चाला केवळ चार दिवस उरल्याने तयारीला वेग आला आहे. तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होणाऱ्या समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी स्वयंसेवक उभे राहणार असून, विविध तालुक्यांतून येणाऱ्या समाज बांधवांना तपोवनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि वाहने उभी करण्यासाठी मैदानांविषयी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. मोर्चाविषयी प्रत्येक घडामोडीची माहिती सोशम मीडियाच्या माध्यमातून समाज बांधवांपर्यत पोहोचविण्याचा कोर कमिटीचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी अग्रस्थानी राहणाऱ्या पंचकन्यांची निवडप्रक्रिया सुरू असून, बुधवारी या पाचही मुलींची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना मोर्चाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली असून, इतर संस्थांही शाळांना सुटी जाहीर करण्याची शक्यता आहे. तर महानगरपालिके च्या शाळांविषयी इतर जिल्ह्णांत घेण्यात आलेला निर्णय लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती मनपा शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांनी मनपाला दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांना परिस्थितीचा आढावा घेऊन सुटी जाहीर करण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना आहे. त्यामुळे शहराजवळील विविध गावांमधील जिल्हा परिषदेच्या काही शाळांनाही सुटी मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीला वेग
By admin | Published: September 20, 2016 11:44 PM