नाशिक : भरभर चला अन् तयारी करा, पटापट लागा रे कामाला... गणपती उत्सव आला रे आला, या गाण्याच्या ओळीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव अवघा पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरासह उपनगरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साह संचारला आहे. सर्वत्र लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशमूर्ती व सजावट साहित्य खरेदी, देखावे, मंडप उभारणी, विद्युत रोषणाई करण्यासाठी मंडळांची धावपळ सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपती बसवण्यासाठी नागरिकांनी आणि बच्चे कंपनीकडून बाजारात गणेशमूर्तीची नोंदणी केली जात आहे. विविध मंडळांनी मंडप उभारणीसह आरास निर्मितीच्या कामास प्रारंभ केला असून, श्रीमूर्तीसह सवाद्य मिरवणुकांचे नियोजन करण्यात मंडळांचे कार्यकर्ते व्यस्त आहेत. आकर्षक श्रीमूर्तींसह भव्य सभामंडप, विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पौराणिक व सद्य:स्थितीवर आधारित आरास गणेशोत्सवातील वैशिष्ट्य ठरते. त्यासाठी प्रमुख मंडळांचे कार्यकर्ते सुमारे महिनाभरापासून तयारीला लागले होते. परंतु महापालिकेकडून नियमांबाबत कोणतीही स्पष्टता मिळत नसल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांवर हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली होती, परंतु आता मनपाकडून गेल्यावर्षाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हिरवा कंदील मिळाल्याने अनेक मंडळांनी श्रीमूर्तींच्या आगमाची तयारी सुरू केली असून, मंडप उभारण्याच्या कामालाही वेग आला आहे.पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रयत्नइको फ्रेंडली गणेशमूर्तींना पसंती गणेशोत्सव साजरा व्हावा पण, तो पर्यावरणपूरक असावा हा विचार अलीकडे सर्वत्र रुजू लागल्याने शहरातील शाळा व महाविद्यालये यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाला प्राधान्य दिले आहे. नागरिकांकडूनही इको फ्रेंडली गणेशमूर्तींना अधिक पसंती मिळत आहे. घरगुती गणेशोत्सवात बहुतांश भाविक शाडूमातीच्याच गणरायांना विराजमान करण्याचे नियोजन करीत आहेत.बाजारपेठ फुललीदेखाव्याच्या साहित्याने फुलला बाजार गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपती प्रतिष्ठापणेसाठी नागरिकांडून तयारी सुरू करण्यात आली आहे. श्री गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल्स ठिकठिकाणी थाटण्यात आले असून, आरास, देखाव्याचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. घरगुती श्री गणरायाच्या देखाव्यासाठी विविध प्रकारचे कपड्यांचे मंदिर, आकर्षक विद्युत माळा, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आदी शोभिवंत वस्तू विक्रीसाठी बाजारात फुलला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या तयारीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:52 AM