नाशिक : भरभर चला अन् तयारी करा, पटापट लागा रे कामाला... गणपती उत्सव आला रे आला, या गाण्याच्या ओळीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव अवघा आठवडाभरावर येऊन ठेपला असताना महानगरपालिकेने गणेशोत्सवासंबंधीचे नियम व अटी शिथिल के ल्याने संपूर्ण शहरासह उपनगरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साह संचारला असून, सर्वत्र लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशमूर्ती व सजावट साहित्य खरेदी, देखावे, मंडप उभारणी, विद्युत रोषणाई करण्यासाठी मंडळांची धावपळ सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपती बसवण्यासाठी नागरिकांनी आणि बच्चे कंपनीने बाजारात गर्दी केली आहे. विविध मंडळांनी मंडप उभारणीसह आरास निर्मितीच्या कामास प्रारंभ केला असून, श्रीमूर्तीसह सवाद्य मिरवणुकांचे नियोजन करण्यात मंडळांचे कार्यकर्ते व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. आकर्षक श्रीमूर्तींसह भव्य सभामंडप, विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पौराणिक व सद्यस्थितीवर आधारित आरास गणेशोत्सवातील वैशिष्ट्य ठरते. त्यासाठी प्रमुख मंडळांचे कार्यकर्ते सुमारे महिनाभरापासून तयारीला लागले होते. परंतु महापालिकेकडून नियमांबाबत कोणतीही स्पष्टता मिळत नसल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांवर हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली होती. परंतु आता महापालिकेकडून गेल्यावर्षाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हिरवा कंदील मिळाल्याने अनेक मंडळांनी श्रीमूर्तींच्या आगमाची तयारी सुरू केली असून, मंडप उभारण्याच्या कामालाही वेग आला आहे.
शहरात भव्य मूर्तीच्या स्पर्धा शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीकारांकडे आपल्या पसंतीच्या गणेशमूर्तींची नोंदणी केलेली असून यात अनेक मंडळांनी भव्य मूर्तीच आपल्या मंडळात विराजित करण्याला पसंती दिली आहे. महापालिकेच्या अटी-शर्तीमुळे मंडळांमध्ये मंडपाचा आकार आणि ठिकाणासह अन्य उत्सवाच्या बाबींविषयी साशंकता होती. त्यामुळे किमान या उत्सवात मूर्ती तरी भव्य स्वरूपाची असावी, या उद्देशाने काही मंडळांनी उंच व भव्य अशा मूर्तींची नोंदणी केली आहे.
इको फ्रेंडली गणेशमूर्तींना पसंतीगणेशोत्सव साजरा व्हावा पण, तो पर्यावरणपूरक असावा हा विचार अलीकडे सर्वत्र रुजू झाल्याने व शहरातील शाळा व महाविद्यालये यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाला प्राधान्य दिले आहे. शहरात अनेक ठिकाणी शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण आयोजित केले जात असून नागरिकांकडूनही इको फ्रेंडली गणेशमूर्तींना अधिक पसंती मिळत आहे. घरगुती गणेशोत्सवात बहुतांश भाविक शाडू मातीच्याच गणरायांना विराजमान करण्याचे नियोजन करीत आहेत.
देखाव्याचे साहित्य बाजारात दाखल अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. श्री गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल्स ठिकठिकाणी थाटण्यात आले असून, आरास, देखाव्याचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. बाजारामध्ये ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. घरगुती श्री गणरायाच्या देखाव्यासाठी विविध प्रकारचे कपड्यांचे मंदिर, आकर्षक विद्युत माळा, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आदी शोभिवंत वस्तू विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत.