सिन्नर : शहर व तालुक्यात गोकुळाष्टमीला गोविंदांच्या दहीहंड्या फुटल्याने आता बैलपोळा व सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पोळ्याला पूजेसाठी लागणारे बैल व गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. बाजारातही विविध सजावटींचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. या दोन्ही सणांसाठी बाजारपेठा सजल्या आहेत.श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोविंदा पथकांचा दहीहंड्यांचा उत्सव झाला की सर्वांना बैलपोळा व गणेशोत्सवाचे वेध लागतात. पोळ्याच्या सणासाठी बैलांना लागणारे गोंडे, माथुटी, गजरे, गुंगरमाळा, हिंगूळ, बेगड, विविध रंग, गजरे, झुली, वेसन आदि सजावटीच्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. यंदा या वस्तूंच्या किमतीत दरवर्षापेक्षा थोडी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दुकानांमध्ये या वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या असल्या तरी त्यांना फारसा उठाव नसल्याचे दिसून येत आहे. येथील रविवारच्या आठवडे बाजारातही चवर, गोंडे, गेरू आदि विक्रीसाठी विक्रेते दाखल झाले आहेत. मात्र पोळ्याच्या आदल्या दिवशी येणाऱ्या रविवारीच या वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखविली आहे. दर्श पिठोरी अमावास्येला पोळ्याचा सण झाला की त्यापाठोपाठ भाद्रपत चतुर्थीला गणेश उत्सवाला प्रारंभ होतो. हे दोन्हीही सण तोंडावर आले आहेत. गणेशोत्सवाची शहरातच अधिक तयारी होते, तर बैल पोळ्याला ग्रामीण भागात अधिक महत्त्व आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात बैलपोळ्याची तयारी सुरू असून, शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.गेल्या काही वर्षांपासून जलप्रदूषण रोखण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था व शासनाच्या वतीने प्रबोधन करण्यात येत असल्याने निर्माल्य व गणेशमूर्ती धरण, विहिरींच्या पाण्यात न टाकता त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचे नियोजनही आतापासूनच सुरू झाले आहे. गणेशमूर्ती बनविणारे, बैल बनविणारे कलाकार या मूर्तींवर अखेरचा हात फिरवत असल्याचे चित्र आहे.त्यानंतर या मूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहेत. या मूर्तींच्याही किमतीत सुमारे ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
पोळा, गणेशोत्सवाच्या तयारीला वेग
By admin | Published: August 18, 2014 11:35 PM