पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात तीन ते चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून, बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी बांधवांना पावसामुळे मका पिकावर कीटकनाशक, तणनाशक फवारणी व आंतरमशागतीची कामे करता आली नाही. आता पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शिवारात सर्वत्र शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र संपूर्ण परिसरात पहावयास मिळत आहे.परिसरात शेतकरी बांधवांनी दरवर्षाप्रमाणे सर्वाधिक मका पिकाची पेरणी केली आहे. मका पिकाच्या दोन टप्प्यात पेरण्या झालेल्या आहेत. अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने दरवर्षाच्या तुलनेत मका पिकावर सर्वाधिक भागभांडवल खर्च करूनही मका पीक हाती लागेल याची शाश्वती शेतकऱ्यांना वाटत नाही.पंधरा दिवसांपासून शेतीची सर्व कामे खोळंबून होती. उघडीप मिळाल्यावर शेतकरी बांधवांनी प्रथमत: मका पिकावरील लष्करी अळीवर औषधी फवारणीला सुरुवात केली आहे.सर्व कामे एका वेळेस आल्याने शेतकऱ्यांना मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. पावसामुळे कोळपणी, रासायनिक खते टाकणे, तणनाशक फवारणी करणे, लष्करी अळी नियंत्रणासाठी फावारणी करणे ही सर्व शेतीची कामे खोळंबली असल्याकारणाने शेतकरी बांधव एक-एक कामे मार्गी लावत आहेत.
पावसाने उघडीप दिल्याने शेतकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:59 AM