नाशिक : आज मनुष्याचे जीवन तणावग्रस्त बनले आहे. कारण समाजातील गोरगरीब गरजू घटकांकडे त्याचे दुर्लक्ष होत आहे. जे लोक कुठलाही देखावा न करता गरजूंच्या उन्नतीसाठी संपत्तीचा काही भाग खर्च करतात, त्यांचे जीवन कधीही तणावग्रस्त राहत नाही, असे कुराणने स्पष्ट केले आहे; मात्र दुर्दैवाने समाजातील धनिकांना या शिकवणीचा विसर पडत चालला आहे, असे प्रतिपादन सुन्नी दावत-ए-इस्लामीचे अध्यक्ष ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना शाकीर अली नुरी यांनी केले.सुन्नी दावत-ए-इस्लामी या धार्मिक राष्टÑीय संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर आयोजित विभागीय ‘सुन्नी इज्तेमा’च्या (धार्मिक मेळावा) समारोपप्रसंगी रविवारी (दि.२७) नुरी मार्गदर्शन करत होते. यावेळी मंचावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मौलाना सय्यद अमिनुल कादरी, प्रा. कारी रिजवान खान, मौलाना जाहीद आदी धर्मगुरू व उलेमा उपस्थितहोते. ‘जकात-दानधर्म’ ही संकल्पना विशद करताना ते म्हणाले, सुफी संतांचे जीवन कधीही तणावग्रस्त नव्हते. कारण सुफी संतांनी कधीही संपत्तीचा मोह केला नाही, तर त्यांनी ‘कुराण’च्या शिकवणीनुसार गोरगरीब घटकांवर ती खर्च करण्यास प्राधान्य दिले.‘जकात’चे ‘पवित्र’ व ‘वाढ’ असे दोन अर्थ आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे, असेही नुरी यावेळी म्हणाले. आजचा मुस्लीम सुफी संतांची शिकवण विसरत चालला असल्याची खंती त्यांनी व्यक्त केली. मेळाव्याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला होता. पहिला दिवस महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. रविवार हा पुरुषांसाठी होता. दिवसभरात विविध धर्मगुरूंनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी मुंबईसह नाशिक विभागातील विविध जिल्ह्यांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिकरीत्या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे पठण करत मेळाव्याचा समारोप करण्यात आला.उपासनेचा अहंकार नकोनमाजपठणाने अहंकार नष्ट होतो आणि तो झालाच पाहिजे, जर तसे होत नसेल तर समाजबांधवाने आत्मपरीक्षण करत कुराणच्या शिकवणीचा अभ्यास करावा. अल्लाहची उपासना (इबादत) करताना मुस्लिमांनी अहंकार बाळगता कामा नये, अशी शिकवण कुराण व हजरत मुहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. नमाजमुळे मन स्वच्छ व निर्मळ तर होतेच, पण मानवी संवेदनाही जागृत होतात असे मौलाना शाकीर अली म्हणाले.
संपत्ती गरजूंसाठी खर्च करा : शाकीर अली नुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:13 AM