येवला : मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण
येवला : तालुक्यात मका सोंगणी शेतीसाठी मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी हैराण झाले आहेत.मजूर मिळत नसल्याने आता शेतकरी यंत्राद्वारे मका पिकाची सोंगणी सुरु केली आहे. श्रिमक लोक मोठ्या संख्येने शहराकडे बांधकाम व कारखानदारीकडे आकर्षित झाल्याने शेतीसाठी मजूरच मिळत नसल्याची ओरड सर्वत्र सुरु आहे.शिवाय मिळालेल्या मजुरांना कामाच्या स्वरूपावरून किमान 200 ते 300 रु पये रोजंदारी द्यावी लागत असल्याने शेतीच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत आहे. रोहयो योजनेत काम नाही आण िशेतातील कामावर जाण्यास मजूर फारसा उत्सुक राहत नाही.या दिवसात कापूस वेचनीच्या कामात ज्यादा मजुरी मिळत असून काम हलके असल्याने ते करण्यास थोड्या फार प्रमाणावर मध्यप्रदेश भागातून आलेले मजूर मिळतात.परंतु मका आणी खरीप हंगामातील ज्वारी काढण्यास मजूर नाही.त्यामुळे आता येवला तालुक्यात मशीनच्या सहाय्याने मकाची सोंगणी करण्याचे दिवस आले आहेत. हार्वेस्टर, मळणीयंत्र,तणनाशके या आधुनिक तंत्रज्ञानाचे परिणाम जाणवू लागल्याने त्याचा उपयोग कमी करून मनुष्यबळाने शेती करण्याचा कल देखील वाढला आहे.परंतु मजुराचा तुटवडा भासत आहे. शेतातील काबाड कष्टापेक्षा शहरातील मोलमजुरी सोपी वाटू लागल्याने,शहरात बांधकाम करण्याच्या कामातील रोजंदारी अधिक फायदेशीर वाटू लागली आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम ग्रामीण भागात शेतमजूराचा वानवा निर्माण होण्यात झाला आहे.शेती व्यवस्थेत रोजगार देण्याची क्षमता घटत आहे शिवाय मजुरांच्या तुटवड्याने शेतकरी हैराण आहे.