नाशिक : जिल्हा साहित्यिक मेळाव्याने प्रारंभापासून नवीन पिढीला वाचनाचे वेड लावत वाचनसंस्कृ ती जोपासण्याचे काम केले असून, या साहित्यिक मेळाव्यांनी विविध साहित्यिकांचे आत्मभान जागवल्याचा सूर ‘साहित्यिक मेळाव्याने काय दिले’ विषयावरील परिसंवादात उमटला. मु. शं औरंगाबादकर सभागृहात सुरू असलेल्या साहित्यिक मेळाव्यातील परिसंवादात गेल्या ५० वर्षांतील विविध साहित्यिक मेळावे अनुभवणाºया साहित्यिकांनी इतिहासातील आठवणींना उजाळा दिला. सार्वजनिक वाचनालयाने वाचकांचे व साहित्यिकांचेही आचारविचार प्रगल्भ करण्याबरोबरच जगण्याचे आणि लिहिण्याचे आत्मभान जागवल्याचे साहित्यप्रेमी व साहित्यिक मेळाव्याच्या माजी अध्यक्षांनी सांगितले. याच ज्ञानाने अनेकांचे जीवन समृद्ध झाले आहे. यावेळी ना. द. जोशी म्हणाले, मागील ४२ वर्षांपासून अविरतपणे मेळाव्यात सहभागी होतो. या प्रदीर्घ काळात मेळाव्याने विचाररु पी ऊर्जा देत जीवन समृद्ध करण्याचे काम केले आहे. एका पिढीला घडवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका वाचनालयाने निभावली. वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक किस्से सांगितले. साहित्यिक मेळावा अनेकांचा श्वास असून, तो वर्षभर लिहिते, वाचते राहण्याची प्रेरणा देत उत्साह टिकवून ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. नवोदितांना वाचनाची गोडी लावून साहित्याचा जागर मेळाव्यातून झाला आहे. यात अधिक नवोदितांची भर पडण्याची गरज असल्याची अपेक्षा अभिमन्यू सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. कौशल्या भगत म्हणाल्या, पदोपदी ज्ञानोपदेश करत जीवनमार्ग सुखकर करण्याचे काम साहित्यिक मेळाव्याने केले आहे. एखादा वारकरी पंढरीच्या वारीची ज्या आतुरतेने वाट पाहतो, त्याच आतुरनेते आम्ही साहित्यिक मेळाव्याची वाट पाहत असल्याचे अॅड. मिलिंद चिंधडे यांनी सांगितले. तसेच ‘सावाना जीवन गौरव’ पुरस्काराचा उल्लेख ‘अ. वा. वर्टी सावाना जीवन गौरव’ करण्याची मागणी त्यांनी केली. अरुणा कुलकर्णी आणि संजय गुजराथी यांनी मेळाव्याविषयी आपल्या आठवणी उपस्थिताना सांगत उजाळा दिला.
साहित्यिक मेळाव्याने जागवले आत्मभान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:55 AM