नाशिक : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’ असे म्हणत सात दिवसांच्या बाप्पासह तीन दिवसांच्या माहेरवाशीण गौरींनाही गुरुवारी (दि. ३१) हळव्या मनाने निरोप देण्यात आला. शहरातील गोदाघाटासह सोमेश्वर, नवश्या गणपती मंदिर, आनंदवली, आसारामबापू पूल आदी ठिकाणी गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.गेल्या अनेक दिवसांपासून शहर परिसरात झालेल्या पावसामुळे तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीपात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. सोमेश्वर धबधबा, सोमेश्वर, नवश्या गणपती आदी ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी होडीतून गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. गणेश विसर्जनादरम्यान आबालवृध्दांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजरासह गुलालाची उधळण करण्यात आली. गंगापूररोड परिसरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. गौरी विसर्जनासह अनेक गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पालाही सातव्या दिवशी भावपूर्ण निरोप दिला. दुपारी दीड वाजेपासून ‘बाप्पा’ विसर्जनासाठी घाटावर येत होते. विसर्जन घाटावर भाविकांनी गणेशमूर्तीसह गौरींचे मुखवटेही आणले होते. यावेळी मातीच्या मुखवट्यांचे विसर्जन तर पितळी मुखवट्यांना नदीच्या पाण्याने स्रान घालण्यात आले.
गौरींबरोबर बाप्पांना भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:57 AM