नाशिक : महाराष्ट्रातील विविध विचारधारांचा अभ्यास, चिंतन शालेय जीवनापासून सुरू झाले. अध्यात्म म्हणजे देवभोळेपणा नाही तर तो उन्नत व उत्कृष्ट जीवन जगण्याचा अध्याय या अंगाने प्रबोधन करू शकल्याचे समाधान असल्याचे प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने झालेल्या ‘एक तास शब्द उपासकासोबत’ या उपक्रमाचे तिसरे पुष्प अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आणि सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. सदानंद मोरे यांनी गुंफले. आपला साहित्य प्रवास रसिकांसमोर उलगडताना ते म्हणाले की महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. वारकरी संप्रदायाच्या संस्कारांनी जडणघडण घडत गेली. संत तुकारामांचा संपन्न वारसा लाभला हे खरोखरच माझे भाग्य आहे. तसेच सगळ्यात चिकित्सक बुद्धी म्हणजे वाचलेलं ऐकलेलं सत्याशी मिळतं जुळतं असेल तेच स्वीकारायचं, अशी जडणघडण बालवयात झाली. आचार्य अत्रेंच्या मराठामध्ये लेख छापून आल्याने स्फूर्ती मिळाली. लहान वयात एवढी सुंदर समज व लेखन म्हणून आचार्य अत्रे यांचे प्रत्यक्ष शाबासकीसह आशीर्वाद मिळाल्यानेही खूप प्रेरणा लाभल्याचे मोरे यांनी नमूद केले . लेखन, वाचन, चिंतन, समीक्षा, तत्त्वज्ञानाचा व्यासंग हे सर्व ओघाओघाने घडत गेले. महात्मा फुलेंचे प्रेरणास्थान संत तुकाराम होते. या संदर्भातील अक्षरधनामुळे वैचारिक संतुलन निर्माण झाल्याचेही मोरे यांनी नमूद केले. मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांच्या कार्याचे मोरे यांनी कौतुक केले. प्रास्ताविक सावळीराम तिदमे यांनी तर सूत्रसंचालन सुरेखा बोऱ्हाडे यांनी केले.