नाशिक : मुलांना नाटक शिकविण्याच्या बहाण्याने तसेच नाटकाच्या प्रयोगासाठी दुबईला नेणार असल्याचे सांगत तोतया नाटककाराने पालकांकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित तोतया नाटककार प्रशांत दामोदर वाघ (२९,खरबंदा पार्क, द्वारका) विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़
गंगापूर रोड परिसरातील रहिवासी पृथ्वीराज विसपुते यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रशांत वाघ याने नाटककार असल्याची बतावणी करून विश्वास संपादन केला. मुलांना नाटक शिकवतो असे सांगितल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून मुलांना नाटक शिकण्यासाठी पाठविले. यानंतर वाघ याने परशुराम सायखेडकर नाट्यगृह व कालिदास कलामंदिर येथे मुलांच्या नाटकाची प्रॅक्टीस घेण्याचा देखावा केला.
यानंतर वाघ याने १६ नोव्हेंबर २०१६ ते दि.१५ मे २०१८ या कालावधीत मुलांना नाटकाच्या कार्यक्रमासाठी दुबईला घेऊन जाणार असल्याचे सांगून मुलांच्या पालकांकडून २ लाख १ हजार रुपये उकळले. त्यामध्ये विसपुते यांच्याकडून ५० हजार रुपये, गौरी कुलकर्णी यांच्याकडून बारा हजार रुपये, तृप्ती तांबे यांच्याकडून ५४ हजार रुपये, समीर जोशी यांच्याकडून बारा हजार रुपये, महेश देशपांडे यांच्याकडून बारा हजार रुपये, गीतांजली भालेराव यांच्याकडून बारा हजार रुपये, उन्मेष कुमठेकर यांच्याकडून ३७ हजार रुपये, शीतल शिंदे यांच्याकडून बारा हजार रुपये असे दोन लाख रुपये घेऊन मुलांना दुबईला घेऊन न जाता पैशांचा अपहार करून फसवणूक केली.
या फसवूक प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गत दोन - तीन महिन्यांपासून तक्रारी करण्यात येत होत्या़ त्यानुसार संशयित वाघ यास पोलीस ठाण्यातही बोलविण्यात आले मात्र त्याने नकार दिला होता़ अखेर पृथ्वीराज विसपुते यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली़