नाशिक : वीकेन्ड लॉकडाऊन असतानाही शनिवारी बाजारपेठेतील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून आल्याने रविवारी बाजारपेठेतील रस्त्यांवर पोलीस तैनात करण्यात आल्याने वर्दळ कमी दिसत होती. दुपारच्या सुमारास मात्र मेनरोड रस्त्यावर काही किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याचे दिसून आले. जिल्ह्यात निर्बंध कायम असून बाजारपेठेची वेळ दुपारी चार वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे. या कालावधीत शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते. सुरक्षितता नियमांकडे दुर्लक्ष करून होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी ठरलेली आहे. नागरिकांनी नियमांची अंमलबजावणी करणे अपेक्षित असले तरी, त्याबाबत फारसे गांभीर्य अजूनही दिसत नाही. शनिवारी वीकेन्ड लॉकडाऊनच्या दिवशी देखील बाजारपेठेत गर्दी झाली होती.
रविवारी मात्र पोलीस तसेच मनपा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आल्यामुळे मुख्य बाजारपेठांमध्ये फारशी गर्दी झाली नाही. अर्धवट दुकानांचे शटर उघडून व्यवसाय करणाऱ्यांना मनपाकडून समज देण्यात आल्यानंतर काही दुकाने बंद करण्यात आली. सकाळी मेनरोडला अनेक दुकानांची शटर्स अर्ध्यावर होती.