नाशिक : पावसाची प्रतीक्षा असलेल्या जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सुमारास काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस झाला तर सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अवघ्या अर्धा-पाऊण तास झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यातील काही भागांत पाऊस सुरू असला तरी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे लागले आहेत. अजूनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने सद्य:स्थितीतही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. गतवर्षी या कालावधीत पावसाला सुरुवात झाल्याने टँकर्सची संख्या घसरली होती. यंदा मात्र पाऊसच न झाल्याने टँकर्सची संख्या दुपटीने वाढली असल्याचे चित्र आहे. गतवर्षी या कालावधीत पावसाला सुरुवात झाली होती; परंतु यंदा अजूनही पावसाची प्रतीक्षा असल्याने सारेच हवालदिल झाले आहेत.
मंगळवारी जिल्ह्यात काही भागांत तुरळक पाऊस झाला. मालेगाव, कळवण, सुरगाणा, दिंडोरी,इगतपुरी, पेठ, निफाड, सिन्नर, चांदवड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील काही भागांमध्ये तुरळक पाऊस झाला. सुरगाणा, सिन्नर आणि पेठ तालुक्यांतील काही गावांमध्ये मात्र मुसळधार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरलाही सायंकाळनंतर काही वेळ रिमझिम पाऊस सुरू होता.
दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या २४ टक्के जलसाठा असून गतवर्षी २६ टक्के इतका जलसाठा होता. या काळात पावसाला सुरुवातही झाली होती; परंतु यंदा मात्र पावसाची प्रतीक्षा लांबली आहे.