वर्षाच्या प्रारंभीच नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. या दोघांमध्ये मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्यात लढत झाली. त्यात हर्षवर्धनने मॅट विभागात अंतिम फेरी गाठली होती. तर, शेळके गादी विभागाचा विजेता होता. हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ असा पराभव करून, महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. त्यामुळे महाराष्ट्राला यंदा नवा तर नाशिकला प्रथमच महाराष्ट्र केसरीचा सन्मान लाभला.
नाशिकचा विदीत जगज्जेत्या संघाचा कर्णधार
कोरोनामुळे प्रथमच ऑनलाइन झालेल्या जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेचे भारताचे नेतृत्व करण्याचा मान नाशिकच्या विदीत गुजराथी याला बहाल करण्यात आला होता. पाचवेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद याचादेखील या संघात समावेश होता. भारताच्या या संघाने रशियासमवेत संयुक्त विजेतेपद पटकावले. त्यामुळे विदीत गुजराथी या नाशिककराच्या नेतृत्वाखाली भारत सांघिक बुद्धिबळात जगज्जेता ठरल्याची नोंद झाली.
महाजन ब्रदर्स आणि ओम महाजनची कमाल
नाशिकच्या डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन या बंधूंनी ‘सी टू स्काय’ ही कन्याकुमारी ते काश्मीर अशी भव्य सायकल एक्सपिडीशन पूर्ण करीत नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला. तर, ओम हितेंद्र महाजन या युवकाने काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकलप्रवास विक्रमी वेळेत पूर्ण करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली.
कविताची राज्य ॲथलेटिक्स कमिटीवर निवड
नाशिकची ऑलिम्पिकपटू कविता राऊत हिची महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर, यंदाच्या वर्षी झालेल्या दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धेत संजीवनी जाधव आणि कोमल जगदाळे यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर बाजी मारली.
सत्यजित बच्छाव ठरला सर्वोत्कृष्ट
नाशिकचा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याने यंदाच्या वर्ष प्रारंभी संपन्न झालेल्या रणजी हंगामात महाराष्ट्राकडून सर्वाधिक ३८ बळी मिळवण्याची कामगिरी करून दाखवली. त्यामुळे यंदाच्या वर्षातील तो महाराष्ट्राचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.