नाशिकरोड : परिसरात शनिवारी मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी घराघरात व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्स पाळत श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली. नाशिकरोड परिसरामध्ये शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी फिजिकल डिस्टन्स पाळत गणेश मूर्ती घरी आणून विधिवत स्थापना केली. तसेच सोसायटी, कॉलनी व छोट्या मंडळांनीदेखील कुठलाही गाजावाजा न करता कोरोना संदर्भात असलेले नियम पाहता विघ्नहर्ता गणेशाची भक्तिभावाने स्थापना केली.नाशिकरोड परिसरामध्ये यंदा कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून फक्त १८ ते २० मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊन नियमानुसार दहा बाय दहाचा मंडप टाकून श्री गणरायाची स्थापना केली. कुठल्याही मंडळाने देखावा न साकारता आकर्षक मंडप टाकून लाडक्या गणरायाची भक्तिभावाने स्थापना केली.दरवर्षीप्रमाणे यंदा घोषणा देत, वाजत-गाजत श्री गणरायाची मिरवणूक काढत आगमन सर्वांनीच टाळले. कोरोनाच्या निर्बंधामुळे गणेश उत्सवातील आनंद व उत्साह भाविकांना तसेच कार्यकर्त्यांना मनात ठेवण्याची पाळी आली होती. सायंकाळपर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी, घराघरात व मंडळाच्या मंडपात गणरायाची स्थापना करण्यात आली. काही मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती स्थापना करण्यापूर्वी मंडपात निर्जंतुकीकरण व सॅनिटायझरची फवारणी करून घेतली.
नाशिकरोडला मंडपात केली सॅनिटायझरची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 12:41 AM