नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे जेव्हा कधी नाशिक दौऱ्यावर येतात तेव्हा दोन-तीन दिवस अगोदर त्यांच्या आगमनाची वर्दी ठरलेली असते, परंतु गुरुवारी राज ठाकरे हे अचानक नाशिकला आले अन् काही तासांतच परत मुंबईला परतल्याची चर्चा पसरली आणि या गोपनीय दौऱ्याबाबत तर्कवितर्काला उधाण आले. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र राज यांच्या दौऱ्याविषयी पूर्णत: अनभिज्ञता दर्शविली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा नाशिक दौरा आजवर कधी गुपचूप-गुपचूप झाल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्या आगमनाची वर्दी दोन-तीन दिवस अगोदरच दिली जाते आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची फौज त्यांच्या दिमतीला हजर राहते. गेल्या वर्षभरात मात्र मनसेत फाटाफूट झाल्यानंतर राज यांचा करिश्मा ओसरला आणि अवतीभवती वावरणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फौजही पांगली. आता राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येतात तेव्हा मुंबई-आग्रा महामार्गावरील एका तारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असतो. गुरुवारी मात्र राज ठाकरे यांच्या अचानक नाशिक भेटीची वार्ता पसरली आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना त्याची कोणतीही खबर न दिली गेल्याने तर्कवितर्काला उधाण आले.
गोपनीय दौऱ्याबाबत तर्कवितर्काला उधाण
By admin | Published: May 15, 2015 1:38 AM