नाशिक : मराठी भाषा निरंतर आहे, मराठी साहित्यामध्ये भविष्यात असेच मोठे काम होत राहो आणि ही भाषा एखाद्या नदीप्रमाणे प्रवाहित राहून पुढे विशाल साहित्यसागराला जाऊन मिळो, असा संदेश वसंत डहाके यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना दिला. तसेच त्यांनी तरुणाईला उद्देशून सांगितले, तरूणांनी मराठी साहित्यामधील विविध लेखकांची पुस्तक ांचे वाचन करण्यावर भर द्यावा, जेणेकरून मराठी साहित्याची व्याप्ती त्यांच्या लक्षात येईल. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न निसंकोचपणष तरुणांनी करावा, इंग्रजी भाषेचे शब्द अन् मराठीची सरमिसळ करू नये, असे आवाहनही डहाके यांनी केले.प्रख्यात कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून बुधवारी (दि.२७) सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डहाके यांनी सपत्नीक कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिली. यावेळी डहाके दाम्पत्याने कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. तसेच प्रतिष्ठानमधील त्यांच्या बैठक खोलीला भेट देत तात्यासाहेबांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचा ठेवा न्याहाळत स्मृतींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक उपस्थित होते.यावेळी डहाके यांनी आपला अभिप्राय प्रतिष्ठानच्या नोंदवहीत नोंदविला. दरम्यान, ते म्हणाले, तात्यासाहेब असताना या वास्तूत येण्याचा अनेकदा योग आला; मात्र आता खूप महिन्यांनी पुन्हा या वास्तूत आल्यावर तात्यासाहेबांच्या स्मृतींनी ही वास्तू आजही भारावलेली असल्याचे जाणवले. तात्यासाहेबांनी मराठी साहित्यासाठी दिलेले योगदानाची प्रचिती या वास्तूत आल्यावर प्रत्येकाला नक्कीच येते.
कुसुमाग्रजांच्या स्मृतींनी भारावलेली वास्तूतात्यासाहेब असताना मी नेहमी या वास्तूत येत असे. येथे आमच्या बैठका होऊन मराठी साहित्याविषयीच्या चर्चा घडत होत्या. दुर्दैवाने तात्यासाहेब आज नाही; मात्र या वास्तुत त्यांच्या आठवणी आजही जीवंत आहे. त्यांचे निवास्थान स्मृतींनी भारावलेले आहे, असे मत जनस्थान पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ लेखक व कवी वसंत डहाके यांनी व्यक्त केले.