नाशिक : वसंत व्याख्यानमाला नाशिक या संस्थेच्या ज्ञानसत्राचा शुभारंभ बुधवार, दि. १ मेपासून होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या व्याख्यानमालेचे यंदा ९८वे वर्ष असून, बाहेरगावच्या मान्यवर वक्त्यांबरोबर स्थानिक वक्त्यांना प्राधान्य दिले आहे.व्याख्यानमालेचे उद्घाटन दि. १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण येथे नाशिकचा शहीद जवान स्क्वॉड्रन लीडर स्व. निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबीयांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे. त्याप्रमाणे यंदा व्याख्यानमालेत शिवशाहीर विजय तनपुरे, समाजप्रबोधनकार संदीप पाल महाराज, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सह्याद्री फार्मर्स कंपनीचे चेअरमन विलास शिंदे, मधुमेह तज्ज्ञ डॉ. सचिन अरसुले, कवी संदीप जगताप, ब्रह्मकुमार रूपेश आणि गीता दीदी, चित्रकार आनंद सोनार, चंद्रकांत निंबाळकर आदींची व्याख्याने होणार आहेत.अश्विनी धुपे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, योगाचार्य अशोक पाटील यांचीदेखील विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. त्याचप्रमाणे पाटेकर बंधू आणि गायिका विद्या कुलकर्णी, अशोक कटारिया व सहकारी यांचा संगीतमय गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच मोहन उपासनी आणि सहकारी यांचा शब्द सूर संवाद हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी दिली.
वसंत व्याख्यानमालेला होणार बुधवारपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:44 AM