उमराणे : चालुवर्षी सर्वत्र मका पिकावर लष्करींचा अळींचा प्रादुर्भाव एवढ्या प्रमाणात वाढला आहे की पोग्यामधल्या अळींनी आता थेट मका पिकाला लागलेल्या कणसात शिरकाव केला आहे.त्यामुळे काही प्रमाणात येणाऱ्या मका पिकाच्या उत्पादनावरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.चालुवर्षी मका पिकाच्या पेरणीनंतरच्या काही दिवसातच लष्करी अळीने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली. परंतु तरीही या अळींचा प्रादुर्भाव थांबत नसल्याने किमान पिक लागवडीसाठी केलेला खर्च व जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी काही शेतकºयांनी दोनवेळा तर काहींनी तिनवेळा औषधांची फवारणी करु न रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला. परंतु प्रादुर्भाव आटोक्यात न येता वाढतच राहिल्याने शेवटी या अळींनी आता मका पिकाला लागलेल्या कणसात शिरकाव सुरु केल्याने काही अंशी येणारे मका उत्पादन घटणार आहे. दरम्यान, मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप, रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले होते. त्यामुळे मागील दुष्काळाची तुट या वर्षी भरु न निघेल या अपेक्षेपोटी शेतकºयांनी आर्थिक परिस्थिती नसतानाही आगामी होणार्या उत्पादनाच्या भरवशावर खाजगी कर्ज घेत कंबर कसली होती. शेतकºयांनी महागडे बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या.परंतु दुष्काळात तेरावा महिना म्हणून चालुवर्षी मका पिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या औषधाची फवारणी करूनही पिक वाचविण्यात यश येत नसल्याने अस्मानी सुलतानी संकटांनी बेजार झालेला शेतकरी पुन्हा लष्करी अंळींच्या वाढत्या प्रभावामुळे हतबल झाल्याचे चित्र आहे. उमराणेसह परिसरातील जवळजवळ सर्वच शेतकºयांनी पिक विमा काढला आहे. पावसाअभावी तसेच लष्करी अळींच्या प्रादुर्भावाने मका पिकांसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे.त्यामुळे शेतक-यांनी भरलेल्या पिक विम्याची रक्कम मिळण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
मक्याच्या कणसात लष्करी अळीचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:52 PM