नाशिक : उत्तर महाराष्टत मान्सूनने प्रवेश केला असून, ही शुभवार्ता आहे. मान्सून रविवारी (दि.१७) सक्रिय झाला. मुंबईत दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे मान्सून सरींचा नाशिककरांवरही शिडकावा झाला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३.६ मि.मी. इतका पाऊस झाला. रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ हवामान कायम होते. सकाळी ८ वाजेपासून शहरासह उपनगरांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान जोरदार सरींचा वर्षाव शहर परिसरात झाला. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता होती; मात्र पावसाने निराशा केली. संध्याकाळी काही भागात रिमझिम स्वरूपात पाऊस झाला. शहरात सकाळी व दुपारी झालेल्या सरींच्या वर्षावामुळे नाशिक करांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मान्सूनच्या सरींचे आगमन शहरात झाल्याने पावसाला अखेर सुरुवात झाली, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. शनिवारी रात्री पावसाने शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून तर रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत ५.२ मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली.
मान्सून सरींचा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:53 AM