नाशिक : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे संरक्षण नाशिककरांना मिळत असताना आता रशियाची बहुप्रतीक्षित असलेली स्पुतनिक लसदेखील उपलब्ध होणार आहे. पुढील आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता असून, शहरातील तीन खासगी रुग्णालयांमधून ही लस दिली जाणार असल्याची माहिती लसीकरण नोडल अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली.
जास्तीत जास्त लसीकरण करण्याला प्राधान्य दिले जात असले तरी लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. नाशिककरांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसी उपलब्ध करून दिल्या जात आहेत; मात्र लसींचा पुरवठा कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने लसीकरणावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. ज्यांच्या लसीचा दुसरा डोस आहे त्यांनादेखील प्रतीक्षा करावी लागत आहे. आता नाशिककरांना रशियाची व्ही स्पुतनिक लसही उपलब्ध होणार असल्याने लसीकरणाला काही प्रमाणात गती मिळण्याची शक्यता आहे.
साधारणपणे पुढील आठवड्यात व्ही स्पुतनिक लस नाशिकमध्ये दाखल होऊ शकते. लसीच्या एका डोसची किंमत चौदाशे रुपये असून, २८ दिवसांनी या लसीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. लस ही ९० टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जाते. शहरातील वोक्हार्ड, सह्याद्री आणि अपोलो या तीन खासगी रुग्णालयांमध्ये ही लस मिळणार असून लसीकरणासाठी नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.
लसीकरणाबाबत मोठी जनजागृती तसेच अठरा वर्षांवरील व्यक्तींनादेखील लस घेण्यास परवानगी असल्यामुळे लोकांकडून लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाला गती देण्याचे सांगितले जात असताना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणावर परिणाम झाला आहे. आता पुन्हा मोहिमेला गती देण्यासाठी जास्तीत जास्त लसी मिळविण्यासाठी प्रयत्न असल्याचेदेखील प्रशासनाकडून सांगण्यात आले.
--इन्फो-
जिल्ह्यात दररोज पन्नास हजार व्यक्तींचे लसीकरण करण्याची क्षमता असून, त्याप्रमाणे नियोजनदेखील करण्यात आलेले आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याने आठवड्यातच तेवढ्या लसी मिळत आहेत. स्पुतनिक लस उपलब्ध झाल्यामुळे काही प्रमाणात अधिक नागरिकांना लस घेता येणार आहे.