------------
कोविड सेंटरऐवजी थेट तपासणी
ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्ण येत नसल्याचा अनुभव लक्षात घेऊन यापुढे थेट रुग्णाच्या दारापर्यंत जाऊन कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असणार आहेत.
------
गृह विलगीकरणाला भेटी
ग्रामीण भागातील प्रयोगशाळांकडील माहिती संकलित करून गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांचा शोध व त्यांच्यावर उपचारासाठी स्वतंत्र पथक असेल. त्यासाठी प्रत्येक बाधितामागे एक अधिकारी, कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाईल. अशा रुग्णांशी फोनवर अथवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एक दिवसाआड संपर्क साधून उपचार व सूचनांची देवाण-घेवाण करण्यात येणार आहे.
--------
जास्तीत जास्त तपासणी
ग्रामीण भागात सध्या दीड हजार रुग्ण असून, या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी दररोज किमान पाच हजार लोकांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील ग्रामीण भागात साडेतीन हजार नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली.
-------
नियमित अहवाल देण्याची सूचना
कोरोना रुग्णांचा शोध व कोरोना तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकाला दैनंदिन आपला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या भागात तपासणी कमी होईल त्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यात येत आहे.
-------
ग्रामीण भागाचा शहराशी निकटचा संबंध येत असल्यामुळे या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधमोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना चाचणी कीटची कमतरता भासू नये म्हणून २५ लाख रुपयांचे ॲन्टिजेन रॅपिड कीट व २५ लाख रुपयांच्या आरटीपीसीआर कीट खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. दररोज तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क केला जात आहे.
- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी