विल्होळी : विल्होळी परिसरातील दत्तनगर, सहाणे मळे भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, त्याने अनेक कुत्रे तसेच जनावरांवर हल्ले चढवून फस्त केल्यामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, मजूर दहशतीखाली आहेत. वन खात्याने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. दिवसाही त्याचे दर्शन होत असल्याने सध्या पावसाळा सुरू असताना ग्रामस्थांना शेती कामासाठी बाहेर पडता येत नाही.बिबट्याच्या दहशतीमुळे रात्र-रात्र जागून पहारा द्यावा लागतो. अनेक शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून येतात त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीने घर केले आहे. वनखात्याने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करून, परिसर दहशत मुक्त करावा, अशी मागणी विष्णू सहाणे, परशराम सहाणे, कैलास भावनाथ, मोतीराम भावनाथ, रामदास कडलक, ज्ञानेश्वर भावनाथ, दिगंबर खांडबहाले, भास्कर चव्हाण, बबन सहाणे आदींनी केली आहे.अनेक दिवसांपासून विल्होळी परिसरात बिबट्याचा वावर असून, याबाबत अनेक वेळा वनविभागाला फोनद्वारे व लेखी स्वरूपात तक्रारी केल्या. परंतु यावर वनविभागाने तक्रारींचे निवारण केले नाही. पिंजराही लावला नाही. परिसरातील नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे.- बाजीराव गायकवाड, सरपंच, विल्होळी
विल्होळी शिवारात बिबट्याकडून श्वान फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:22 AM