शहरातील विठ्ठल मंदिरेनाशिक : जुने नाशिक परिसरातील संत नामदेव पथवर असलेल्या श्री संत नामदेव विठ्ठल मंदिराचा इतिहास पाहता किमान १५० वर्षे मागे जावे लागेल. १९व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात या मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराची देखभाल नामदेव शिंपी समाजाकडे होती.सुरुवातीस मंदिरात विठ्ठल-रु क्मिणीच्या छोट्या मूर्ती होत्या. कालांतराने रुक्मिणीमातेची मूर्ती भंग पावल्यानंतर आता ज्या आहेत, त्या काळ्या पाषाणाच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली गेली. कालानुरूप मंदिरात बरेच बदल करण्यात आले. नामदेव महाराजांची नंतर ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या मूर्र्तींचीही स्थापना करण्यात आली.मंदिरात रोज काकड आरती, महिला मंडळाचा हरिपाठ, दर एकादशीला तसेच रामनवमी, कृष्णजन्म, संतांचे समाधी सोहळे अशाप्रसंगी नामदेव महाराज भजनी मंडळाचे संगीत भजन असते. आषाढी व कार्तिकी एकादशीला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात. त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते ‘श्रीं’ची महाआरती केली जाते. तसेच मंदिराचे बांधकाम झाल्यापासून नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.या मंदिरात जोग महाराज, लक्ष्मण महाराज, बंकटस्वामी, सोनोपंत दांडेकर (मामा), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादी संत, महात्म्यांनी या मंदिरात कीर्तन, प्रवचन आदी भगवतसेवा केली आहे. संत गाडगे महाराजांचे वास्तव्य आणि कीर्तनसेवा येथे झाली आहे. बंकटस्वामी हे मंदिराच्या गाभाऱ्याच्या डाव्या बाजूच्या खांबाला टेकून गीतापाठ, चिंतन करत अशाही आठवणी काही वृद्ध भाविक सांगतात. त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची दिंडी जी आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघते, ती सुरू झाल्यापासून तिचा दुसरा मुक्काम याच मंदिरात असतो. सदर परंपरा सव्वाशे ते दीडशे वर्षांची आहे.
श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर, जुने नाशिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:08 AM