पाटोदा : मनुष्याने प्राण्यांवर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, भागवतकार सांगतात मनुष्याने ज्याचे अंतकाली चिंतन केले जाते त्याचा पुढील जन्म मिळतो म्हणून अंतकाळी देवाचे चिंतन करावे म्हणजे जीवनातून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन वेदांताचार्य प्रभाकर महाराज शास्त्री (आळंदी देवाची) यांनी मुरमी, ता. येवला येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेचे चौथे पुष्प गुंफताना व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, भरत राजाने खूप तपश्चर्या केली परंतु शेवटी हरिणाचे पिलू पाळले, त्या हरिणाची खूप आसक्ती झाली. शेवटी हरीण हरीण म्हणून प्राण सोडला. त्यांना पुढील जन्म हरिणाचा मिळाला म्हणून प्राण्यावर प्रेम करावे पण आसक्ती करू नये, असे महाराजांनी समजावले. महाराजांनी कपिल देवहुती संवाद, ध्रुव चरित्र, जडभरत रहु गण संवाद, अजामिल व्याख्यान, प्रल्हाद चरित्र, दक्षप्रजापती चरित्र आदी प्रसंग कथन केले. कथेप्रसंगी संगीत भजने होत असल्याने भाविक तल्लीन होऊन भजने गाऊन नाचतात. कार्यक्रमास अंबादास महाराज जगताप, निवृत्ती महाराज चव्हाण, शिवाजी महाराज गायके, वाल्मीक महाराज कदम, नारायण महाराज काळे, अमृता शिंदे, सरपंच रघुनाथ शिंदे, उपसरपंच नारायण गुंजाळ, कृष्णा गरूडे, आनंदा शिंदे, शिवाजी महाले, रावसाहेब बढे, पांडुरंग गायके आदी मान्यवर व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्र मासाठी संगीत विशारद हरिभाऊ महाराज टेकाडे, सिंथेसाइजर मदन महाराज नखाते, आॅर्गनायझर रमेश महाराज बिटे, तबलावादक सुनील महाराज ढेंगळे आदींची सुरेख साथ संगत लाभली असल्याने कार्यक्रमास उत्तरोत्तर रंग भरत आहे. शेवटी ग्रंथाची आरती यजमान नवनाथ शिंदे यांच्या हस्ते होऊन कथेचा समारोप करण्यात येतो.
येवला येथे श्रीमद्भागवत कथा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:42 AM