नाशिक : राज्य सरकारच्या धोरणांविषयीचा शेतकऱ्यांच्या मनात असलेला संतापाचा गुरुवारी उद्रेक बेमुदत संपाची हाक देऊन झाला. जिल्ह्यासह राज्यात शेतकरी संपावर गेल्यामुळे कायदा सुव्यवस्थेला कुठलाही धोका उद्भवू नये संपाला हिंसक वळण लागून उग्र स्वरूपाच्या आंदोलनात रूपांतर होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ग्रामीण भागात राज्य राखीव दल (एसआरपी), दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) चा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, सातबारा कोरा करावा, कर्जमाफी द्यावी, अखंड वीजपुरवठा करावा, अशा एकूण सात मागण्या घेऊन बळीराजाने संपाची हाक देऊन बेमुदत ‘सुटी’ घेतली. यामुळे राज्यातील मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांची एकप्रकारे रसद रोखली गेली. दरम्यान, संपाची पहिली ठिणगी जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पडली. वडाळीभोई, चांदवड, नैताळे या भागात संपकरी आक्रमक झाले व त्यांनी भाजीपाला घेऊन जाणारा टेम्पो पेटविला, तर दूध व फळभाज्यांची वाहतूक करणारी वाहने रोखली. टॅँकरमधील दुधाचे पाट रस्त्यावर वाहत होते आणि टमाटा, कांद्याचा सर्वत्र सडा पहावयास मिळत होता. यामुळे तणावाचे वातावरण पसरले. अखेर आक्रमक संपकऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, तर कुठे अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. दरम्यान, हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला तालुक्यांत संपाला मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. संध्याकाळनंतर ग्रामीण भागातील स्थिती नियंत्रणात आली होती.
एसआरपी-आरसीपीचा फौजफाटा : बळीराजाचा संप
By admin | Published: June 01, 2017 9:47 PM