नाशिक : गेल्या अठरा महिन्यांपासून रखडलेल्या एस.टी. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सध्या थंडबासनात गेला आहे. वेतनाच्या मुद्द्यावरून हमरीतुमरीवर आलेले कामगारांचे प्रतिनिधी वर्चस्ववादाचे राजकारण करीत असल्यानेच कामगारांच्या वेतनाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आता महामंडळात सुरू आहे.मागील वेतनकरार संपून आता १८ महिन्यांचा कालावधी लोटला आहे, मात्र अद्याप नवीन वेतनाचा मसुदा ठरलेला नाही. एस.टी. कामगार संघटनेने करार पद्धतीला विरोध करीत वेतन आयोगानुसार वेतनचा मसुदा ठरविण्यात यावा, अशी मागणी लावून धरली आहे तर कामगार सेनेने वेतन करारच कामगारांच्या फायद्याचा असल्याचा दावा करीत करार करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तर इंटक संपाचीदेखील हाक दिली आहे. वेतनाच्या मुद्द्यावरून सह्यांची मोहीम, मेळावे, चड्डी-बिनियान आंदोलन इतकेच नव्हे तर कामगारांच्या महिलांनीदेखील आंदोलनासाठी कंबर कसली होती. सोशल मीडियावरदेखील वेतनाचा मुद्दा गाजला होता. वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळाने तयार केलेल्या वाटाघाटी उपसमितीसमोर समोर दोन्ही कामगारांचे प्रतिनिधी आमने-सामने आले होते. त्यामुळे समितीला कोणताही निष्कर्ष न काढता काढता पाय घ्यावा लागला होता. काही अतिउत्साही कार्यकर्ते तर हातघाईवर आले होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले होते. जुलै महिन्यात वेतनाच्या प्रश्नावर अनेक घडामोडी सातत्याने घडत होत्या मात्र गेल्या दीड महिन्यांपासून वेतनाबाबत कुणीही काहीच बोलायला तयार नसल्याने वेतनाच्या प्रश्नाला जणू ‘ब्रेक’च लागला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सण उत्सवांचा काळ जवळ आला आहे. पुढील महिन्यांपासून दसरा-दिवाळीचे वेध लागतील मात्र एस.टी. कामगारांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कुणालाच कल्पना नाही. वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने उपसमिती स्थापन केलेली आहे. मात्र या समितीलाच आक्षेप असल्याने समितीकडूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. सगळेच मौन बाळगून असल्याने कर्मचाºयांनाही आश्चर्य वाटत आहे.
एस.टी.च्या वेतनप्रश्नाला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:46 AM