नाशिक : जिल्ह्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर शुक्रवारी (दि. ९) राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पुन्हा एकदा प्रवाशांचा जीव टांगणीला लावला होता. गडावरील धोंड्या-कोंड्याच्या विहिरीजवळील तीव्र चढावर सिन्नर आगाराच्या बसने दम तोडल्याने बसमधील ९० प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता; परंतु चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
सदर बसचे ब्रेक न लागल्याने अन्य दोन वाहनांचे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर शुक्रवार हा देवीचा वार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराची बस (क्रमांक एमएच- २०, बीएल- ३५७८) नाशिकहून सप्तशृंगी गडाकडे जाण्यासाठी निघाली होती. गडावरील धोंड्या-कोंड्याच्या विहिरीजवळ बस आली असता, रस्त्याला तीव्र चढ असल्याने बस पुढे न जाता मागे येऊ लागली.
यावेळी बाका प्रसंग उभा राहिला. या बसमध्ये सुमारे ९० प्रवासी होते. जुनी बस असल्याने; तसेच बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्याने गाडीचे ब्रेक लागले नाहीत. यावेळी बसचालकाने प्रसंगावधान राखून रस्त्याच्या डाव्या बाजूला बस सरकत नेली व कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला जाऊन थांबविली. या घटनेने बसमधील प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. बस थांबताक्षणीच प्रवासी जिवाच्या भीतीने पटापट गाडीच्या खाली उतरले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
चालक चक्क ब्रेकवरच उभा राहिला शुक्रवार हा देवीचा वार असल्याने गडावर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी वाहने पार्क केली होती. ब्रेक न लागल्याने मागील बाजूने एसटीने दोन वाहनांना धडक दिल्याने त्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या खासगी वाहनांत चालक झोपलेले होते. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. चालकाने चक्क ब्रेकवर उभे राहून बस थांबविण्याचा प्रयत्न केला.