नाशिक : कोरोनामुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्या काही वाहनांमधून खासगी मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.9) सायंकाळी नाशिकरोडरेल्वे मालधक्क्यावर पाच मालवाहतूक बसेस खताच्या गोण्या वाहतुकीसाठी दाखल झाल्याचे दिसून आले. कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने एसटी महामंडळासमोर आर्थिक उत्पन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने आपल्या मालवाहतूक बसेस खाजगी व शासनाच्या मालवाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक डेपोच्या पाच मालवाहतूक बसेस मंगळवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातील मालधक्क्यावर खताच्या गोण्या भरण्यासाठी दाखल झाल्या होत्या. मालधक्क्यावर टेम्पो, ट्रक यांच्याव्यतिरिक्त पहिल्यांदाच बसेस आल्याने कामगारांनी सुरुवातीला आश्चर्य व्यक्त केले . मात्र एसटी महामंडळाने व्यवसायासाठी आपल्या मालवाहतूक बस मालवाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्याचे समजल्यानंतर माथाडी कामगारांनी त्या बसेस मध्येे खताच्या भरून दिल्या. एका मालवाहतूक एसटी बस मधून आठ टन खताच्या गोण्या वाहतुकीसाठी भरण्यात आल्या असून आज पहिल्याच दिवशी एसटीच्या पाच वाहनांमधून तब्बल 40 टन खत गोण्या नांदगाव तालुक्यात रवाना झाले आहे.
खत वाहतुकीसाठी एसटी बस मालधक्क्यावर ; नांदगाव तालुक्यात 40 टन खत रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 7:24 PM
कोरोनामुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने एसटी महामंडळाने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर पाच मालवाहतूक बसेस खताच्या गोण्या वाहतुकीसाठी दाखल झाल्याचे दिसून आले.
ठळक मुद्दे एसटी बसमधून शेतीसाठी खताची वाहतूक एसटीची उत्पन्नवाढीसाठी मालवाहतुकीला सुरुवात