नाशिक : त्र्यंबकेश्वरी तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीच्या दिवशी भाविकांच्या संख्येबाबत पोलिसांचा अंदाज फसल्यानंतर गर्दी व्यवस्थापनासाठी यंत्रणेने परिवहन महामंडळाच्या एसटी बस रस्त्यातच रोखून धरल्या आणि भाविक त्र्यंबकेश्वरपर्यंत टप्प्याटप्याने पोहोचतील अशा होल्ड-रिलिज तंत्रांचा वापर बसगाड्यांच्या माध्यमातून केल्याची शक्यता असून त्याचा फटका मात्र बाहेरगावाहून आलेल्या भाविक आणि महामंडळालाही बसला.कुंभमेळ्यातील तिसऱ्या पर्वणीला फार मोठ्या संख्येने भाविक येतील असा अंदाज बांधून पोलीस खात्याने नियोजन केले असले तरी पर्वणीच्या पूर्वसंध्येलाच किमान लाखाच्या घरात भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते. शनिवारी पर्वणी पूर्ण होईपर्यंत ही संख्या इतकी वाढली की, त्र्यंबकेश्वरातील गर्दी बाहेर पडल्याखेरीज नवीन भाविकांना सामावून घेणे शक्य नव्हते. यामुळेच बहुधा पोलीस खात्याने मुळातच भाविकांना १२ वाजेच्या आत त्र्यंबकेश्वर येथे भाविक आणण्यास मनाई केली त्यासाठी अडथळे दूर केले नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे भाविक नाशिकमधून त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये बसले त्यांना त्र्यंबकेश्वरपासून बारा किलोमीटर अंतर अगोदरच रस्त्यावर उतरवून देण्यात आले. पायपीट करणारे भाविक तीन ते चार तासात पोहोचतील तोपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील गर्दी कमी होईल, असा बहुधा पोलिसांचा कयास असावा. इतकेच नव्हे तर नाशिक शहरात मेळा स्थानकात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने त्र्यंबकेश्वर येथे गर्दी आवरणे अडचणीचे ठरण्याची शक्यता होती. त्यामुळेच नाशिकमधून मेळा स्थानक ते त्र्यंबकेश्वर दरम्यानच्या एसटी बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु या तंत्राचा वापर महामंडळाच्या अंगलट आला. प्रवाशांनी पायपिटीमुळे मनस्ताप व्यक्त केलाच, परंतु महामंडळाच्या नियोजनावर ताशेरे ओढले. (प्रतिनिधी)
एसटीच्या बस रोखून होल्ड आणि रिलिज
By admin | Published: September 25, 2015 11:57 PM