उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत दोन पेट्रोल पंप आणि एक सीएनजी पंप उभा राहणार आहे. पेट्रोल आणि गॅस वितरणाच्या माध्यमातून महामंडळ उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजन करीत आहेत. महामंडळाचा सीएनजी पंप सिन्नर मार्गावर होऊ शकतो तर दोन्ही पेट्रोल पंप नाशिक शहरात उभे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्या महामंडळाच्या जागेची पाहणी करून याबाबतचा निर्णय घेणार आहेत.
मेळा स्थानक होणार पूर्ण
एअरपोर्टसारख्या सुविधा असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे मेळा स्थानक नव्या वर्षात पूर्णत्वास येणार आहे. खासगीकरणातून उभारण्यात येत असलेल्या या स्थानकाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला नवीन वर्षात गती लाभणार आहे. या स्थानकामध्ये मिनी थिएटर, शॉपिंग मॉल, उपाहारगृहे, निवारागृहे तसेच स्मार्ट पार्किंग अशा अनेक सुविधा असणार आहेत.
इलेक्ट्रिकल बसेस
महामंडळाच्या ताफ्यात यंदा इलेक्ट्रिकल बसेस दाखल होणार आहेत. डिझेलवर होणारा खर्च टाळण्याबरोबरच प्रदूषणमुक्तीसाठी नाशिकच्या काही मार्गांवर इलेक्ट्रिकल बसेस धावणार आहेत. फेब्रुवारीत याबाबतचे सर्वेक्षण होऊन कोणत्या मार्गावर महामंडळाच्या बसेस सुरू करता येतील याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरची पहिली बस नाशिकमधून धावणार आहे. त्यादृष्टीने नवीन वर्षात व्यापक प्रयत्न केले जाणार आहेत.
सीएनजी बसेस धावणार
डिझेलवरील खर्च कमी करण्यासाठी जिल्ह्यातील काही मार्गांवर सीएनजी बसेस नवीन वर्षात सुरू हेाणार आहेत. शहरातील बससेवा बंद झाल्यानंतर अनेक गाड्या या जिल्ह्यासाठीदेखील उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे गाव-खेड्यांत मागणी असलेल्या ठिकाणी बसेस सुरू करणे महामंडळाला शक्य होणार आहे. गावातील रस्ते आणि लांब पल्ला यांचा विचार करून सीएनजी बसेस सुरू करण्याबाबतच्या हालचाली होत आहेत. डिझेलची बचत आणि पर्यावरण पूरक बसेस महामंडळाच्या ताफ्यात असणार आहेत.