देवळाली कॅम्प : एसटी महामंडळाच्या भाडेवाढीचा फटका मासिक पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला असून, कमी अंतर असताना पासची मासिक रक्कम वाढवल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. भगूर बसस्थानकावरून दरवर्षी दोन हजारांपेक्षा जास्त मासिक पास काढले जातात. बस भाडेवाढ करण्यात आल्याने मासिक पासच्या रकमेत अंतर कमी असतानासुद्धा मोठी दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी भगूरहून धोंडीरोड शाळेत किंवा लॅमरोड एसव्हीकेटी महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना २२० रुपये मासिक पाससाठी लागत होते. मात्र भाडेवाढ झाल्याने विद्यार्थ्यांना मासिक पाससाठी चारशे रुपये मोजावे लागत आहेत. भगूरपासून बिटको महाविद्यालयापर्यंत गेल्या वर्षी ३२० रुपये मासिक पाससाठी लागत होते. मात्र आता पाचशे रुपये पाससाठी लागत आहेत. एसटी महामंडळाकडून १८ टक्के भाडेवाढीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात मासिक पासकरिता ४५ ते ५५ टक्के भाडेवाढ करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांना मासिक पास सवलतीच्या दरात देताना राज्य शासन एसटी महामंडळाला अनुदान देते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ठरावीक किलोमीटरकरिता ठरावीक रक्कम आकारावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.अवास्तव भाडेवाढ रद्द करावीएसटी महामंडळाने मासिक पास भाड्यात केलेली अवास्तव वाढ रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांंकडून केली जात आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत दोनवाडे, पांढुर्ली, शिवडा या मार्गावर दोन, तर लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी व साकूर, शेणीत, धामणगाव या मार्गावर एक एक बस सोडावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
एसटी महामंडळाच्या भाडेवाढीचा विद्यार्थ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:59 PM