नाशिक : गैरहजर राहिलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई सुरूच असून, मंगळवारी (दि. ८) आणखी तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ४६३ इतकी झाली आहे. एस.टी. बसेस सुरळीत सुरू ठेवण्याबरोबरच गैरहजर कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचे सोपस्कारही प्रशासनाला पार पाडावे लागत आहेत.
सध्या तालुका पातळीवर एस.टी.च्या बसेस सुरू असून, इगतपुरी तालुक्यातील काही गावांमध्येही एस.टी.ची प्रवासी वाहतूक सुरू झालेली आहे. जवळपास सर्वच आगारांमधून बसेस धावत आहेत. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याने बसेसची देखील संख्या वाढत असल्याचे एस.टी. महामंडळाकडून सांगण्यात आले. पुणे आणि धुळे मार्गावरील खासगी शिवशाही बसेस नियमित सुरू आहेत.
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळेच जुने आणि नवीन सीबीएस येथील स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे दिसते. वाढणारी प्रवासीे संख्या लक्षात घेता बसेसच्या फेऱ्या वाढविल्या जाण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.
दरम्यान, कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत ४६३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी आणखी १३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असल्याने बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ३४० पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. महामंडळाच्या नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांवरील कारवाई सुरूच राहणार असून, त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठीची संधीदेखील दिली जात आहे. यातील काही कर्मचारी कामावर रुजू झाले असून, आणखी काही कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीची तयारी दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले.