लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एसटी महामंडळाने सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर संपूर्ण मतदानप्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर गुरुवारी (दि.१) औरंगाबाद येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यात ९९.९३ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे, तर केवळ ६४ कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे येत्या ८ जून रोजी होणाऱ्या बैठकीत संपाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय पवार यांनी दिली.राज्य एसटी महामंडळातील चालक, वाहक, यांत्रिकी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. तुटपुंजे वेतनामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे; मात्र महामंडळ व सरकारकडून याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या वतीने राज्यभर संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यापूर्वी कायद्यातील घटनात्मक तरतुदीनुसार मतदानप्रक्रि या मागील आठवड्यात राबविण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात एकूण ८३ टक्के मतदान झाले होते. नाशिक शहरातील दोन्ही आगार व यांत्रिकी विभागातील मिळून सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांनी मतदानप्रक्रियेत सहभाग नोंदविला होता. त्यानंतर, गुरुवारी औरंगाबाद येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व राज्यांमधील मतदानाची आकडेवारी सादर होऊन त्याची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत पवार यांनी सांगितले, मतदानप्रक्रियेत १ लाख ४ हजार कर्मचाऱ्यांपैकी ८५ हजार ६० कर्मचाऱ्यांनी मतदानात सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ८४ हजार ९९६ कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे, तर ६४ कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याने प्रशासनाला संपाची नोटीस दिली जाणार आहे. येत्या ८ जूनला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत होणाऱ्या बैठकीत संपाची तारीख घोषित केली जाणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अटळ
By admin | Published: June 02, 2017 1:40 AM