पंचवटी : एसटीचा धक्का लागल्याच्या कारणावरून पंचवटी बस आगारातील सुरक्षारक्षक, तसेच वाहनचालकावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याच्या निषेधार्थ संतप्त कर्मचाऱ्यांनी बस आगार ते पंचवटी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून निषेध नोंदविला. हल्ला करणाऱ्या सर्वच संशयितांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करून पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, दुपारी बारा वाजता सर्व संघटनेचे सभासद घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी रस्त्यावर उतरल्यामुळे सुमारे दोन तास बससेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे दुपारी शाळेतून घराकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. काल सोमवारी सायंकाळच्या सुमाराला एसटीचा धक्का लागल्याच्या कारणावरून कुरापत काढून वाल्मीकनगर (वाघाडी) येथील सात ते आठ जणांच्या टोळक्याने बस आगारात धाव घेऊन डेपो मॅनेजरला भेटायचे आहे, असे सांगून आगारात प्रवेश केला. त्यावेळी सुरक्षारक्षक शंकर गाढवे व चालक नितीन जाधव यांनी मॅनेजर घरी गेले आहेत तुम्ही सकाळी येऊन भेटा, असे सांगितले. त्या कारणावरून टोळक्याने दोघा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून सशस्त्र हल्ला चढविला होता.
एसटी कर्मचारी उतरले रस्त्यावर
By admin | Published: December 16, 2015 12:10 AM