नाशिक : कोरोनाच्या संकट काळात प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्नाचे पर्याय स्त्रोत शोधले आणि महामंडळाच्या तिजोरीला आर्थिक हातभार लावला. एसटीने बसेसेच रूपांतर मालवाहू वाहनात केले, मात्र या मालवाहू बसेस चालविणाऱ्या चालकांना भुर्दंड सोसावा लागला. याकडे महामंडळाने आता कुठे दखल घेतली आहे.
मागीलवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास नऊ महिने महामंडळाची प्रवासी बससेवा बंद करण्यात आलेली होती. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रवासी वाहतूक बंद असल्याने या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाला पॅकेज द्यावे लागले. त्यातून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न काही महिने सुटला असला तरी प्रवासीसंख्या कमी होत असल्याने उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत म्हणून महामंडळाने आपल्या भंगारातील बसेसचे रूपांतर मालवाहू वाहनात केले आणि खासगी व्यावसायिक, उत्पादक, कारखान्यांकडील मालवाहतूक सुरू केली. त्यामुळे महामंडळाला आर्थिक लाभही झाला.
या गाडीवर चालक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या चालकाला मात्र चांगलाच मनस्ताप सोसावा लागला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालवाहतूक करताना चालकांना प्रसंगी मुक्काम करावा लागला. त्यामुळे मुक्काम तसेच जेवणाचा खर्च वैयक्तिक स्वरूपात करावा लागला. दोन-तीन दिवसांसाठी वेळ लागला तर खर्च अधिक वाढत राहिला. त्यामुळे चालकांना भुर्दंड सोसावा लागला. महामंडळाकडून कोणताही भत्ता दिला जात नसल्याने प्रसंगी ॲडव्हान्स घेण्याची वेळ चालकांवर आली.
--इन्फो--
मालवाहतूक सुरू असलेल्या ट्रक्स
५०
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक्स
५०
--इन्फो--
कोरोना काळात कोट्यवधींची कमाई
----
जून २०२० ते मे २०२१ या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहू ट्रक्सच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार ४१४७ फेऱ्या करून मालट्रक्सने ३ कोटी, २० लाख, १९ हजार ९२० इतकी कमाई केली. सुमारे १०३८ बसेसची बुकिंग इतर विभागांकडून करण्यात आली होती. त्या माध्यमातून महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतर आस्थापनांनी एसटीच्या मालवाहू बसेसला प्राधान्य देऊन मालवाहतूक करावी, असे आदेश शासकीय विभागांना देण्यात आलेले हेाते. खासगी आस्थापनांनीदेखील कोरोनाच्या काळात एसटीच्या मालवाहतूक ट्रक्सवरच भरवसा टाकल्याने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडली.
--इन्फो--
परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम
महामंडळाच्या मालवाहू ट्रक्सवर चालक म्हणून असलेल्या चालकाला मोठ्या आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागले. बाहेरगावी जावे लागत असतानाही त्यांना जेवण तसेच मुक्कामासाठी कोणताही भत्ता दिला गेला नाही. त्यामुळे खिशातून त्यांना खर्च करावा लागला. काही चालकांना तर पगारातून ॲडव्हान्स घेऊन मालट्रकवर ड्युटी करावी लागली. वेतनातून ॲडव्हान्स कट केला जातो. चालकाला जेवणासाठी आणि राहण्यासाठी स्पेशल असा कोणताही अलाउन्स दिला जात नाही. किलोमीटर तसेच नाईट भत्ता असल्याने वेगळा भत्ता देण्याची गरज नसल्याचे महामंडळाकडून सांगितले जाते. म्हणजे एसटी मालामाल होत असताना चालक मात्र कंगाल होत आहेत.
--इन्फो--
चालक म्हणतात...
चालकांना मालवाहू ट्रक्सची सक्ती केली गेली. वास्तविक अनेक चालक उपलब्ध असतानाही अन्य कुणालाही जबाबादारी देणे शक्य होते. परंतु एखाद्याने ड्युटी नाकारली तर त्याच्यावर कारवाई केली जाते. मालवाहू ट्रकवरील ड्युटी म्हणजे खिशाला कात्री अशी परिस्थिती असल्याने अनेक चालक तयार नसतात.
- किसन बोराळे, एकचालक
मालवाहतूक वाहनावर ड्युटी लागली की आगोदर आपल्याला स्वत:ची तयारी करावी लागते. घरात काटकसर करून घरातून पैसे घेण्याची वेळ अनेकदा आली. पैसे नसल्याने अनेकांना ॲडव्हान्स घ्यावा लागतो. ड्युटीवर जाताना चालक ॲडव्हान्स घेत असेल तर याचा विचार महामंडळाने कारायला हवा.
-- देवीदास मंडलिक
--इन्फो--
ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट
१) दाैऱ्यासाठी ॲडव्हान्स दिला जातो, पण पगारातून ही रक्कम कपात केली जाते. त्यामुळे चालकाला भुर्दंड बसत आहे.
२) नियमाप्रमाणे किलोमीटर तसेच नाईट भत्ता असल्यामुळे इतर भत्ता नाकारला जात असल्याने चालकांमध्ये नाराजी
३) परतीसाठी मालवाहतूक मिळेपर्यंत चालकाला तेथेच थांबावे लागते. त्यामुळे दोन ते तीन दिवसही लागतात.
४) ड्युटी नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला जात असल्याने चालकांवर दबाव येत आहे.
--इन्फो--
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर अनेकदा आवाज उठविणाऱ्या संघटनांकडून सध्या मौन बाळगले जात आहे. सध्या राज्यात आणि महामंडळात सुरू असलेल्या प्रकरणी कोणतीही संघटना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कुणीही आवाज उठवित नसल्याने चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांमध्येदेखील नाराजी आहे.