नाशिक : कोरोनाचा प्रकोप वाढत असताना, परप्रांतीय मजुरांचे लोंढे गावाकडे परतू लागले असताना, या मजुरांना त्यांच्या जिल्ह्याच्या सीमारेषेवर सोडण्यासाठी एस. टी. महामंडळाने सेवा बजावली. मागील वर्षी मे, जून आणि ऑगस्ट महिन्यांत परप्रांतीय मजुरांची वाहतूक करणाऱ्या चालक-वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा महामंडळाने केली होती. त्यानुसार विभागातील चालकांना सेवेचे मोल वितरित करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात सर्वाधिक आर्थिक फटका परिवहन महामंडळाला बसला. त्यांच्या वेतनाचाच नव्हे तर महामंडळ अस्तित्वात राहणार की नाही इतका मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशाही परिस्थितीत महामंडळाने अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णालयात जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कोरोना काळात सेवा दिली. कोरेाना ऐन जोमात असल्याने परप्रांतीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या गावांमध्ये सोडण्यासाठी चालकांनी जीव धोक्यात घालून प्रवासी सेवा दिली. छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यांच्या सीमारेषेपर्यंत चालकांनी परप्रांतीय मजुरांना नेऊन सोडले. प्रवासाच्या काळात चालकांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला. एवढे करूनही त्यांनी या काळात पूर्ण क्षमतेने सेवा दिली. त्यांना या कामासाठी महामंडळाने ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर केला होता. या प्रोत्साहन अनुदानाचे जिल्ह्यात वाटप करण्यात आले.
--इन्फो--
११३ पेक्षा अधिक कर्मचारी पॉझिटिव्ह
कोरोनाच्या काळात सेवा बजावताना किमान तीन महिन्यांच्या कालावधीत शंभरपेक्षा अधिक चालक तसेच काही अधिकारी पाॅझिटिव्ह आल्याचे सांगितले जाते. कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत असताना प्रवाशांच्या संपर्कात आल्याने चालक, वाहक तसेच काही अधिकारी बाधित झाले. परराज्यांतील सीमारेषांपर्यंत प्रवासी सेवा देण्याबरोबरच मुंबईत बेस्टसाठीही नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. त्यामुळे शंभरपेक्षा अधिक कर्मचारी बाधित झाले. जिवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.
--इन्फो--
कोरोना जोमात असताना केवळ तीन महिन्यांसाठी ३०० रुपये प्रोत्साहन योजना राबविण्यात आली. त्यामुळे या काळात अनेक चालकांनी मिळालेली सेवा बजावली. त्याचा लाभ चालक, वाहकांना झाला. परंतु पुढे या योजनेला वाढ देण्यात आली नाही. वास्तविक काेरोनाचा प्रभाव अजूनही कमी झालेला नसतानाही चालक-वाहकांना विनामोबदला धोका पत्करून काम करावे लागत आहे. जवळपास सर्व बसेस सुरू झालेल्या आहेत. प्रवासी वाहतूक वाढत असली तरी धोकाही तितकाच वाढत आहे.