नाशिक : कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन, भत्ते आणि कामाचा मोबदला याबाबत राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आर्थिक लाभ मिळावेत, या मागणीसाठी एस.टी. कामगार संघटना कृती समितीच्या वतीने राज्यातील विभागीय कार्यालयांसमोर उपोषण करण्यात आले. त्यानुसार नाशिक येथेही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
राज्य परिवहन महामंडळाने परिपत्रक काढून काही मागण्या मान्य केलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. कामगारांना वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के व घरभाडे भत्त्याचा दर अपेक्षित लागू केलेला नाही नसून हे अन्यायकारक असल्याचे कृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता २८ टक्के लागू केलेला असतानाही राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना २०१९ पासून १२ टक्के इतकाच महागाई भत्ता दिला जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये असेलेल्या नाराजीविषयी कृती समितीने व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देऊन आंदोलनाची भूमिका कळविली होती. त्यानुसार बुधवारी विभागीय कार्यालयांसमोर उपोषण करण्यात आले. यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही किंवा याबाबत काही तोडगा काढला नाही तर आगार पातळीवर आंदोलन केले जाणार आहे. बुधवारच्या उपोषण आंदोलनाने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा बिगुल वाजविला असून, २७ तारखेपासून राज्यभर बेमुदत संपाचा इशारा देण्यात आलेला आहे.
नाशिकमधील आंदोलनात एसटी कामगार संघटनेचे विजय पवार, विभागीय सचिव स्वप्नील गडकरी, बुद्धमनी जोगदंड, इंटकचे विजय गायकवाड, आर. डी. गवळी, बहुजन कर्मचारी संघटनेचे नागभिंडकर, एसटी कामगार सेसेचे श्याक इंगळे, देवा सांगळे, कास्ट्राईबचे जनार्दन जगताप, शशिकांत ढवळे, चालक, वाहक संघटनेचे कैलास कराड, शशिकांत जाधव सहभागी झाले होते.