नाशिक - विलीनीकरणाच्या संदर्भात न्यायालयात समितीने बाजू मांडल्यानंतर सायंकाळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र नाशिकमधील कर्मचारी संपावर ठाम राहाणार असून, परिवहनमंत्र्यांचे आवाहन आणि कामगार नेते गुजर यांचा निर्णय अमान्य करीत कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास नकार दिला आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ५४ दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. प्रत्येक आगारासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आहे, तर मुंबईत आझाद मैदानावरदेखील कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी नाशिकमधील १३ डेपोंमधील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आजवर सुमारे ३५० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर १३०पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर बदल्यांची कारवाई करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांनी कारवाईला न जुमानता संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सोमवारी न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता यावर २२ रोजी निर्णय होणार आहे.
तत्पूर्वी सायंकाळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन करीत मंगळवारी कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील आजवर झालेली कारवाई मागे घेण्याचे जाहीर केले, तर विलीनीकरणाबाबत समिती जो निर्णय देईल तो मान्य असल्याचे सांगत कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी आपण संप मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे काहीसा संभ्रमदेखील निर्माण झाला आहे. गुजर यांनीच विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपाची नोटीस महामंडळाला दिली होती.
गुजर यांच्या या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत कामावर न परतण्याची भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाशिकमधील एसटी कर्मचारीदेखील कामावर रुजू होणार नसल्याचे सांगण्यात आले.