नाशिक : नाशिकमध्ये परिवहन महामंडळ कर्मचार्यांचा संप चिघळला असून कर्मचाऱ्यांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला आहे. दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी देखील नाशिक जिल्ह्यातील एकाही डेपोमधून बस बाहेर पडली नाही.
जिल्ह्यातील सर्वच आगारांच्या सेवकांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला दिवाळीच्या सणात राज्य परिवहन महामंडळाच्या सेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. रविवारी संध्याकाळी पुकारलेला संप हा मंगळवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होता बंद पुकारला गेल्यामुळे प्रवाशांना बाहेर गावी जाणे मुश्कील होऊन बसले आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, महामार्ग, ठक्कर बाजार या बसस्थानकावर आल्यावर बसचा संप असल्याचे अचानक समजल्यानंतर प्रवाशांना सोमवारी पुढील प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये महिला बालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत . मात्र मंगळवारी हे प्रमाण कमी होते नागरिक आपल्या खाजगी वाहनाने किंवा ट्रॅव्हलच्या वाहनाने प्रवास करताना दिसून येत होते मंगळवारी हा फरक दिसून येत होता. एन.डी. पटेल रोड येथील परिवहन महामंडळाच्या मुख्यालय बाहेर वेगवेगळे संघटनांकडून धरणे आंदोलन सुरू आहेत या आंदोलनाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी देखील आपले समर्थन दिले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये संप पुकारल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारी नाशिक मधील एन डी पटेल रोड येथील परिवहन महामंडळाच्या मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं आणि शासनाचा निषेध केला यावेळी बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितले की शासन राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विनाकारण वेठीस धरत आहे. त्यांची मागणी जर पूर्ण झाली तर आंदोलन एका मिनिटात मागे घेतल्या जाऊ शकतात.