किरण ताजणे
राज्य शासनात विलानीकरण आणि वेतनासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी सुरू केलेले आंदोलन अधिक आक्रमक होऊ लागले आहे. आज संपाचा सलग दिवस आहे. मात्र प्रवाशांचे हाल बघून नाशिकच्या बसस्थानकावरून पोलीस बंदोबस्तात पुणे आणि धुळे शहरासाठी दोन शिवशाही बसेस रवाना करण्यात आल्या. परंतु महामार्ग बसस्थानकावर उभ्या असलेल्या दोन बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. त्यात एका बसचे लाईट तर दुसऱ्या बसची मागील बाजूची काच फुटल्याची घटना घडली.
प्रवाशांचे हाल, आर्थिक शोषण आणि होणारी गैरसोय बघून एसटी महामंडळाने पोलिसांच्या मदतीने नाशिकमधून दररोज १० शिवशाही बसेस पाठवण्याचं वेळापत्रक बनवलं आहे. या नियोजनामुळे प्रवाशांचा मनस्ताप काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असली तरी सुखकर प्रवासाचा मुद्दा निर्माण झालाय.
शहर मध्यवर्ती बसस्थानकातून गुरुवारी दुपारनंतर धुळे आणि पुणे शहरासाठी दोन शिवशाही रवाना करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मोटरसायकलवरुन आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी थेट महामार्ग बसस्थानकात जाऊन उभ्या असलेल्या शिवशाहीच्या काचा फोडल्या आहे त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.