सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. हवेत गारठा निर्माण झालेला होता. दुपारी साडेतीनच्या दरम्यान हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. मात्र थोड्याच वेळात वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस कोसळ्यास सुरुवात झाली. अवेळी आलेल्या पावसाने सुमारे तासभर हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी व भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली. पावसाने शेतात पाणी साचल्याने कांदे लागवड करणे अशक्य झाले. कडक ऊन पडल्याशिवाय आणखी आठवडाभर कांदे लागवड पुढे ढकलावी लागेल. कांद्याचे तयार असलेली रोपे पिवळी पडून खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही ठिकाणी गहू, हरबऱ्याची निंदणी सुरू आहे. या अवकाळी पावसाचे पाणी शेतात साचल्याने निंदणी थांबली आहे. परिणामी पिकांमध्ये गवत, तण वाढून पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सध्या द्राक्षांचा हंगाम आहे, मात्र या अवकाळी पावसाने द्राक्षे व लागवड केलेल्या कांद्यावर फवारलेले महागडे कीटक व बुरशीनाशक यांचा परिणाम कमी होऊन केलेला खर्च वाया जात असल्याने शेतकरी चिंतित आहे.
फोटो- एकलहरे परिसरात पडलेल्या धुवाधार पावसामुळे द्राक्षबागा व नुकत्याच लागवड केलेल्या कांदा पिकात साचलेले पाणी.