नाशिक : कोरोनाचे सावट असतानाही सरकारने बांधकाम क्षेत्रातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला चांगलाच बुस्ट मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यात गत आर्थिक वर्षातील पहिल्याच महिन्यात म्हणजे एप्रिल २०२० मध्ये एकही दस्त नोंदणी झालेली नसतानाही अकरा महिन्यांत मुद्रांक शुल्क विभागाने तब्बल १ लाख ३७ हजार ३०२ दस्त नोंदणीच्या माध्यमातून मार्च अखेरपर्यंत ८०२ कोटींची वसुली करून शंभर टक्के इष्टांकाचे लक्ष्य गाठले आहे.
बांधकाम व्यावसायाला बुस्ट देण्यासाठी सरकाने ३१ डिसेंबरपर्यंत तीन टक्के सवलत दिली होती. या सवलतीचा ग्राहकांनी भरभरून लाभ घेतल्याने सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांत मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याने बांधकाम क्षेत्राला बुस्ट मिळाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबरनंतर तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलतीत एक टक्क्याने कपात करण्यात आली. त्यामुळे १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत मुद्रांक शुल्कात दोन टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे अनेक ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे अखेरच्या आठवड्यात उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील सातही उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी करण्यासाठी ग्राहकांची रिघ लागली होती. यात शहरातील प्रमुख कार्यालयांमध्ये गर्दी अधिक होती. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी नाेंदणी शुल्क आगाऊ भरून पुढील चार महिन्यांत दस्तनाेंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाच्या दृष्टीने अनेकांनी दोन टक्के मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेत आपले स्वप्नातील घर खरेदीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
इन्फो-
महिना - दस्त नोंद - महसूल (रुपयांमध्ये)
एप्रिल २०२० -००-००
मे २०२० -२२४७ - १७ कोटी ३६ लाख
जून २०२० - ८०१३ - ५३ कोटी ८ लाख
वर्षभरात १ लाख ३७ हजार दस्त नोंद
जुलै २०२० - १०५२९ - ६६ कोटी
ऑगस्ट २०२० - १०५०२ - ६१ कोटी ८७ लाख
सप्टेंबर २०२०- ११,४७२ - ५३ कोटी ६५ लाख
ऑक्टोबर २०२०- १३,३७२ - ६८ कोटी २१ लाख
नोव्हेंबर २०२०- १२,५७८ - ५५ कोटी ७० लाख
डिसेंबर २०२०- २१००२- १८७ कोटी २८ लाख
जानेवारी २०२१- १४५४८- ८४ कोटी ८१ लाख
फेब्रुवारी २०२१- १५९८० -५६ कोटी ९६ लाख
२५ मार्च २०२१ - १६९८८- ८६ कोटी १६ लाख
एकूण -१,३७,३०२ - ८०२ कोटी ९ लाख