नाशिक : प्रचलित मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून मुद्रांक विक्रेत्यांना दहा टक्के मनोती मिळावी यासह मुद्रांक विक्रेत्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते सोमवार (दि.९)पासून राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य शासन मान्य मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने हा बेमुदत संप पुकारला असून, नाशिक मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनाही या संपात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सलीम काझी व सचिव मनोज गांगुर्डे यांनी दिली आहे. राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था बदलण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेऊ नये. तसेच विक्रे त्यांना दहा टक्के मनोती मिळावी. राज्यात सुरू असलेली ई-चलन तसेच ई एसबीआरटी ही प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फतच राबवण्यात यावी. एसपीप्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच परवाना मिळावा.मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या मुलांना वारसा हक्कानेच परवाना मिळावा. या मागण्या संघटनेने महसूल मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत मांडल्या होत्या. शासनाने कोणत्याच मागणीबाबत सकारात्मक विचार केलेला नाही. त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांनी संपाचे हत्यार उपासले आहे.
मुद्रांक विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:15 AM