नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक अखेरीस जाहीर झाली असून, येत्या गुरुवारी म्हणजेच १८ जुलैस निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्तांनी महापालिकेला याबाबत कळवले असून, सोमवारपासून (दि.१५) अर्ज वितरण सुरू होणार आहे.महापालिकेच्या स्थायी समितीबरोबरच त्याच दिवशी शहर सुधार, विधी, आरोग्य वैद्यकीय आणि महिला तसेच बाल कल्याण समितीच्या सभापतिपदासाठीदेखील याच दिवशी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे काम बघणार आहेत. एकाच दिवसात पाच समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणूक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांची मुदत २८ फेबु्रवारीसच संपली, परंतु त्यानंतर सदस्य नियुक्त करताना भाजपाच्या कोट्यातून आठ सदस्य नियुक्त करण्यास शिवसेनेने विरोध केला होता. भाजपाच्या एका नगरसेवकाच्या निधनामुळे या पक्षाचे तौलनिक संख्याबळ कमी झाले असून, त्यामुळे भाजपाचा एक सदस्य कमी होऊन सेनेचा सदस्य वाढतो असा सेनेचा दावा होता. त्यामुळे न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते. दरम्यान, लोकसभा निवडणूक होत असल्याने त्या धामधुमीत विभागीय आयुक्तकार्यालयाने एक सदस्य नियुक्तीस परवानगी दिली नाही. ती आता दिल्यानंतर गेल्या ९ जुलैस समितीवर कमलेश बोडके यांची वर्णी लागली असून, अन्य समित्यांचे सदस्यदेखील पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्त करण्यात आले. सर्व समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे. प्रत्येक विषय समित्यांमध्ये नऊ सदस्य असून, त्यापैकी पाच सदस्य भाजपाचे असल्याने याच पक्षाचे सभापती होणार हे उघड आहे.स्थायीसाठी जोरदार स्पर्धास्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपात चुरस असून, गणेश गिते, कमलेश बोडके आणि उद्धव निमसे यांच्यात काट्याची स्पर्धा आहे. अर्थात, तिघेही पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांपैकी असून त्यामुळे तेच याबाबत निर्णय घेतील असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, महापालिकेच्या नुकत्यात झालेल्या चार विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपाचे वीस सदस्य निर्वाचित झाले. त्यातील १२ सदस्य पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघातून असून, अन्य विभागांतील आमदार आणि नगरसेवकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी पूर्व नाशिक शिवाय अन्य विभागातील दावेदारांचीदेखील चाचपणी सुरू आहे.
स्थायी समिती सभापतिपदाची १८ रोजी होणार निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:36 AM
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक अखेरीस जाहीर झाली असून, येत्या गुरुवारी म्हणजेच १८ जुलैस निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्तांनी महापालिकेला याबाबत कळवले असून, सोमवारपासून (दि.१५) अर्ज वितरण सुरू होणार आहे.
ठळक मुद्देभाजपात रस्सीखेच : अन्य समित्यांचाही गुरुवारीच फैसला