नाशिक : महापालिकेच्या महासभेप्रमाणेच स्थायी समितीच्या सभेत चालणाऱ्या कामकाजाचेही इतिवृत्त लेखन करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी नगरसचिव विभागाला दिले आहेत. येत्या सभेपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून, यापुढे स्थायीत होणाऱ्या कामकाजाचा दस्तावेज उपलब्ध होणार आहे. महासभेत चालणाऱ्या कामकाजाचे ध्वनिमुद्रण होण्याबरोबरच सदस्यांनी केलेल्या चर्चेची ओळन् ओळ इतिवृत्तात शब्दबद्ध केली जात असते. परंतु, दर आठवड्याला स्थायी समितीत होणाऱ्या कामकाजाचे इतिवृत्त लेखन केले जात नव्हते. सिंहस्थ कुंभमेळा काळात स्थायी समितीने स्वच्छताविषयक ठेक्यासंदर्भात जे काही निर्णय घेतले त्याबाबतचे वाद न्यायालयात जाऊन पोहोचले. त्यामुळे स्थायीत होणाऱ्या कामकाजाचे कुठेही दस्तावेज उपलब्ध होत नसल्याचे सदस्यांच्या लक्षात आले. त्यानुसार स्थायी समितीचे सदस्य प्रा. कुणाल वाघ यांनी वारंवार स्थायीच्या बैठकीत कामकाजाचे इतिवृत्त लेखन करण्याची मागणी लावून धरली. याशिवाय कामकाजाचे रेकॉर्डिंगही करण्याची सूचना केली; परंतु त्याबाबत दखल घेतली गेली नव्हती. दरम्यान, पेस्ट कंट्रोलसंदर्भात स्थायी समितीने प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आयुक्तांनी स्थायीचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला आहे. त्यावर नगरविकास खात्यात सचिवांकडे सुनावणी सुरू आहे. यावेळी स्थायीच्या कामकाजाच्या इतिवृत्ताची मागणी करण्यात आली असता महापालिका प्रशासनाची कोंडी झाली. त्यामुळे यापुढे स्थायी समितीच्या कामकाजाचे इतिवृत्त लेखन करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी नगरसचिव विभागाला दिले आहेत. (प्रतिनिधी)
स्थायी समितीचेही होणार इतिवृत्त लेखन
By admin | Published: October 28, 2015 11:51 PM