इंदिरानगरमधील गजानन महाराज मार्ग हा सर्वात जुना व मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सदर मार्गावरून शहर वाहतूक बस सेवा सुरू होती. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक शहरात ये-जा करण्यासाठी बससेवेचा लाभ घेत होते. गजानन महाराज मार्गालगत महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, सिद्धिविनायक सोसायटी, मोदकेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कमोदनगरसह विविध अपार्टमेंट व सोसायट्या आहेत. या परिसरात नागरीकरण वाढत असताना शहर वाहतूक बससेवेने पंचवीस वर्षांपासून बससेवा बंद केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मुंबई महामार्गावर पायपीट करीत जावे लागते. या मार्गावरही बसफेऱ्या कमी असल्याने बसथांब्यावर बस थांबत नाही. त्यामुळे जादा पैसे देऊन रिक्षाद्वारे नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. आता महापालिकेची बससेवा सुरू झाल्याने महापालिकेने या मार्गावरून बस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
गजानन महाराज मार्गावर बस सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:11 AM