कळवण : कोरोना महामारीमुळे शेतकरी गेल्या वर्षभरापासून आर्थिक अडचण सहन करीत आहे. पिकविलेला माल विकला जात नाही, त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी लागणारे खत, बियाणे कसे खरेदी करायचे, असा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, त्यामुळे शासनाने कोरोनाबाबत सर्व शासकीय नियम पाळून लवकरात लवकर बाजार समितीतील खरेदी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना कळवण तालुका भाजपाच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले असून, त्यात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडलेले असल्याचे नमूद केले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अचानक लॉकडाऊन करावा लागला आहे. या लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समितीतील खरेदी व्यवहार बंद असल्याने बळीराजाने पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या पिकांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
महागडे बियाणे व निसर्गाच्या लहरीपणाने आधीच अनेकांच्या तोंडातला घास हिरावला आहे. ज्याठिकाणी खरेदी-विक्री सुरू आहे, त्याठिकाणी लूट भावात माल विकावा लागत आहे. शेतकऱ्यांचा कांदा व इतर शेतमाल विकला गेल्यास त्यांना आगामी खरीप हंगामासाठी खते व बियाणे घेता येणार आहेत, त्यामुळे शासनाने बाजार समितीत कोरोनाची योग्य नियमावली राबवून सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांनी केली आहे.