नाशिक : समूह गायन, समूह नृत्य, मिमिक्री, शास्त्रीय गायन, वादविवाद, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, फोटोग्राफी, रांगोळी, पोस्टर मेकिंग, आॅन दि स्पॉट पेंटिंग आदि स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दमदार कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आयोजित केलेल्या केंद्रीय युवक महोत्सवात राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्यातील कलागुणांना वाव दिला. समूह गायन, समूह नृत्य, शास्त्रीय गायन स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. मिमिक्रीने उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला, तर वाद-विवाद, वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट भाषणशैलीने विविध विषयांवर मंथन करण्यात आले. दरम्यान, महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्र विद्याशाखेचे संचालक प्रा. दादासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर समारोप अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या प्रभारी संचालक प्रा. विजया पाटील, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख श्याम पाडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व विजेते विद्यार्थी अमरावती येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय स्पर्धेत मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. (प्रतिनिधी)
केंद्रीय युवक महोत्सवास उत्साहात प्रारंभ
By admin | Published: October 18, 2014 12:45 AM